Mon. Jun 23rd, 2025

Maharashtra News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील ८७००० कर्मचारी व अधिकारी यांच्या पगारातून कपात केलेली १२४०कोटी रुपयांची रक्कम एसटीने पी. एफ.ट्रस्टमध्ये भरली नसल्याने गुंतवणुकीवरील अंदाजे १०० कोटी रुपये इतकी व्याजाची रक्कम बुडाली असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे पीएफ व ग्र्याजुटीचे दोन स्वतंत्र ट्रस्ट असून ८७ हजार एसटी कर्मचारी व अधिकारी यांची

भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफची अंदाजे १२४० कोटी रुपये व उपदान म्हणजे ग्र्याजुटीची अंदाजे ११०५ कोटी रुपये इतकी रक्कम अशी मिळून अंदाजे २३४५ कोटी रुपयांची रक्कम फेब्रुवारी २४ पासून एसटीने दोन्ही ट्रस्टकडे भरणा केलेली नाही.

कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली पी. एफ. ची रक्कम पीएफ ट्रस्टकडे भरणा केली जाते.व ट्रस्ट ही रक्कम गुंतवणूक करते.व त्यावरील येणाऱ्या व्याजातून कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतर सदरची रक्कम ८.२५ टक्के इतक्या दराने परत करण्यात येते. पण गेले अनेक महिने एसटीने सदरची रक्कम गुंतवणूक केली नसल्याचे त्यावरील व्याज व चक्रवाढ व्याज बुडाले असून त्याचा फटका साहजिकच कर्मचाऱ्यांना बसणार आहे.

संपा नंतर शासनाने नेमलेल्या त्रि सदस्यीय समितीने कर्मचाऱ्यांच्या वेतनाला लागणारी पूर्ण रक्कम राज्य सरकार कडून एसटीला देण्यात येईल असे शपथपत्र न्यायालयात दिले आहे. पण त्यानंतर कधीही पूर्ण रक्कम देण्यात आलेली नाही. परिणामी पीएफ ट्रस्ट अडचणीत सापडली असून इ.पी. एफ. ओ. ऑफिसने काही नियम, अटी व शर्ती घालून सदर ट्रस्टला मान्यता दिली असून त्यांनी घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली होत आहे. इ. पी. एफ. ओ.ने ट्रस्टवर कारवाई केल्यास कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ शकते अशी शंकाही बरगे यांनी व्यक्त केली आहे.

वर्षानुवर्षे पी. एफ. व ग्राजुटी ह्या दोन्ही ट्रस्ट अत्यंत चागल्या प्रकारे चालल्या असून इ .पी. एफ. ओ .ऑफिस सुद्धा एसटीची ट्रस्ट ही सर्वात चांगली ट्रस्ट असल्याचे सांगत आहे. पण शासनाच्या उदासीनतेमुळे ह्या दोन्ही ट्रस्ट अडचणीत आलेल्या आहेत. सुदैवाने राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कडे एसटीच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. आता यापुढे तेच एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंब प्रमुख झाले असून त्यांनी या प्रकरणी लक्ष घालून सदरची रक्कम एसटीला व्याजासहित शासनाकडून मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंतीही बरगे यांनी त्यांना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *