Mon. Jun 23rd, 2025

Karjat Politics : कर्जत नगरपंचायतीत मोठा राजकीय भूकंप झाला असून तब्बल 13 नगरसेवक सहलीवर गेल्याने आता नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्याची राजकीय हालचालही सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस आणि भाजपचे एकूण 13 नगरसेवक एकाच वेळी सहलीवर गेल्याने राज्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कर्जत नगरपंचायतीत अस्थिरता होती. गटनेते संतोष मेहत्रे यांनी नगराध्यक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, “मागील निवडणुकीत दडपशाही झाली होती. नगराध्यक्ष पदाचे वाटप अडीच वर्षांनी होणार होते, पण त्याकडे दुर्लक्ष केले गेले. जनतेचे प्रश्न सुटत नाहीत, म्हणून आम्ही अविश्वास ठराव आणला आहे.”


या ठरावाला राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपच्या 13 नगरसेवकांचा पाठिंबा आहे. यामध्ये महिला नगरसेविकांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. या नगरसेवकांनी सोमवारी जिल्हाधिकारी पंकज आशियाना यांच्याकडे अर्ज सादर करून कारवाईची मागणी केली आहे.

राजकीय संघर्षात आमदार रोहित पवार यांची अडचण
ही घटना आमदार रोहित पवार यांच्यासाठी मोठा धक्का ठरत आहे. कारण नगरपंचायतीतील बहुसंख्य नगरसेवक त्यांच्या विरोधात उभे आहेत. त्यांच्या विरोधकांनी हालचालीला गती दिली असून, आमदार राम शिंदे यांच्या समर्थकांचा हातभार लागलेला दिसतो.

“निवडणुकीतील दडपशाहीची प्रतफेड” – प्रवीण घुले
माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांनी या राजकीय हालचालीला “निवडणुकीतील अन्यायाची प्रतिक्रिया” म्हटले आहे. त्यांनी म्हटले, “आम्ही गेल्या काळात दडपशाही सहन केली, पण आता जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्यायचा वेळ आला आहे. यापुढील निर्णय जनहिताच्या दृष्टीने घेतले जातील.”

तर दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी अविश्वास ठरावावर लवकरच निर्णय घ्यावा, अशी मागणी नगरसेवक करीत आहेत.

सहलीवर गेलेले 13 नगरसेवक
सौ. रोहिणी सचिन घुले
सौ. छायाताई सुनिल शेलार
संतोष सोपान मेहत्रे
ज्योती लालासाहेब शेळके
सतीश उद्धवराव पाटील
लंकाबाई देविदास खरात
भास्कर बाबासाहेब भैलुमे
भाऊसाहेब सुधाकर तारेडमल
ताराबाई सुरेश कुलथे
मोनाली ओंकार तोटे
मोहिनी दत्तात्रय पिसाळ
अश्विनी गजानन दळवी
सुवर्णा रविंद्र सुपेकर

कर्जत नगरपंचायतीतील ही राजकीय उलथापालथी स्थानिक पातळीवर नवे समीकरण निर्माण करणारी आहे. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची मागणी करत या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांवर दबाव आणला आहे. पुढील काही दिवसात या प्रकरणाचा निकष लागणार असून, राजकीय पटावर नवे बदल दिसून येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *