Laxman Hake on Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर मंत्री पदासाठी अजित पवार कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ देखील अजित पवारांवर नाराज असल्याचे वृत्त समोर येत असल्याने छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती मात्र आता अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना मंत्रीपदाची संधी देत भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले असल्याचे देखील बोलले जात आहे.
तर दुसरीकडे छगन भुजबळ तो झाकी है सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील अभी बाकी है. सुप्रिया सुळे केंद्रात , रोहित पवार, जयंत पाटील राज्य मंत्रिमंडळात काहीच दिवसांत पाहायला मिळतील असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. ते आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
यावेळी लक्ष्मण हाके म्हणाले की, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उशिरा का होईना छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिले त्याचा स्वागत आहे.ओबीसींच्या दृष्टिकोनातून छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळातील समावेश आवश्यक होता. मात्र ओबीसींचे आरक्षण आणि आरक्षणामधील घुसखोरी हे ओबीसी आणि ओबीसी नेत्यांसमोरील येत्या निवडणुकीमधील अडचणीचे प्रश्न आहेत.
छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाने या लढाईला बळ मिळणार आहे. असं माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले.
तसेच छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि जयंत पाटील या सगळ्यांना सदिच्छा आहे पण ओबीसींच्या प्रश्नांवर भूमिका घेणार नसाल तर गाठ ओबीसी चळवळीशी आहे हे लक्षात ठेवा असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.